Uttarvahini Narmada Parikrama
नर्मदा परिक्रमा हे प्रत्येक भाविकाचे स्वप्न आहे. नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही आपण रोमांचित होतो. अशावेळी तीचा प्रत्यक्ष सहवास घडविणारी ही परिक्रमा आपल्या जीवनाला जणू एका अदभुत अनुभूतीचा परीस स्पर्श करुन जाईल. गरूडेश्र्वरजवळ गुजरात राज्यात बडोदाजवळील धनेश्वर ते रेंगण व रेंगण ते रामपुरा अशी नर्मदा नदी उत्तर वाहिनी आहे. म्हणजे ती उत्तर दिशेने वाहते. कोणत्याही नदीने उत्तर दिशेने वाहणे हे अत्यंत पुण्यदायी समजले जाते. वाराणसी (काशी) येथे गंगा नदी वरूण घाटापासून अस्सी घाटापर्यंत उत्तर वाहिनी आहे. म्हणूनच काशी अत्यंत पुण्यदायी आहे. नर्मदापुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये बळी राजाची एक कथा आहे त्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये जर “उत्तर वाहिनी” नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, अशी साक्षात नर्मदामैय्याने खात्री दिली आहे. तीन वर्ष तीन महिन्यांमध्ये किंवा सहा महिन्यामध्ये संपूर्ण पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे प्रत्येकाला सहज शक्य नसते. त्या सर्वांसाठी चैत्र महिन्यातली एक दिवसांची उत्तर वाहिनी नर्मदा परीक्रमा ही एक अनोखी पर्वणी आहे.